खोक्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून रवी राणांनी माघार घेतल्यानंतरही बच्चू कडू यांनी अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यातून त्यांनी राणांना इशारा देण्यासह कॅबिनेट मंत्रिपदासाठी लक्ष वेधण्याचा हेतूही साध्य केला. मात्र, कडू यांनी कितीही मोठे शक्तिप्रदर्शन केले तरी त्यांना राज्य मंत्रिपद देण्यावर मुख्यमंत्री ठाम असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
अपक्ष आमदार असूनही ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू यांना शालेय शिक्षण आणि कामगार विभागाचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी आशा त्यांना होती. परंतु, अन्य अपक्ष आमदार नाराज होण्याच्या शक्यतेमुळे आयत्या वेळेस त्यांचा पत्ता कापला गेला. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याचे आश्वासन त्यांना त्यावेळी देण्यात आले.
आता दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जी संभाव्य नावे समोर येत आहेत, त्यात कडू यांचा समावेश असला, तरी पुन्हा राज्यमंत्री पदाचीच माळ गळ्यात पडणार आहे. मात्र, ते कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शिंदे गट आणि भाजपामधील इच्छुकांची संख्या आणि उपलब्ध पदांची स्थिती पाहता, कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी राणांच्या विधानाआडून ‘कॅबिनेट’साठी दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
गोगावलेंचा पत्ता कट?
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्रीपर्यंत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची नावे यादीत होती. पण आयत्यावेळी ती काढण्यात आली. त्यानंतर बरेच नाराजीनाट्य रंगले. परंतु, पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते शांत झाले. पैकी शिरसाट यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असली, तरी गोगावलेंना मात्र मंत्रिपदाला मुकावे लागणार आहे. त्यांना म्हाडा किंवा अन्य मोठ्या महामंडळाचे अध्यक्षपद देण्यासंदर्भात चर्चा सुरू आल्याचे कळते. तसे झाल्यास गोगावले काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या ते शिंदे गटाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आहेत.
Join Our WhatsApp Community