ठाकरे गटाचे नेते शरद कोळी पोलिसांना चकवा देत अज्ञात स्थळी रवाना; पोलिसांकडून शोध सुरु

156

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. शरद कोळी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका जिल्हाधिका-यांनी ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे याचप्रकरणी शरद कोळी यांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता कोळी अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. त्यांच्या या यात्रेदरम्यान ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सभेत भाषण करताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट

शरद कोळी यांनी टीका करताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिका-यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली. याच मुद्यावरुन पोलीस जेव्हा कोळी यांना ताब्यत घेण्यासाठी ते ज्या हाॅटेलवर थांबले होते त्या हाॅटेलवर गेले तेव्हा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. या वादानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिका-यांसह पोलीस ठाण्याच्या दिशेला पायी चालत गेल्या. त्यानंतर पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत होते. या दरम्यान पोलिसांचे आदेश झुगारुन शहर पोलीस ठाण्याबाहेरुन शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले.

( हेही वाचा: Western Railway: पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने )

पोलिसांना चकमा देत अज्ञात स्थळी रवाना

यानंतर पोलिसांनी शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी चोपडा शहराकडे जाणा-या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. या दरम्यान महापौरांच्या गाडीतून शहर पोलीस ठाण्याहून निघालेले शरद कोळी मात्र चोपड्याच्या सभेकडे न जाता पोलिसांना चकमा देत अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.