अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केलीआहे. परंतु त्यांना राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड अनिल परब यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गट याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे परब यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: आता महाविद्यालयेच ठरवणार अभ्यासक्रम; UGCची सुधारित नियमांना मंजुरी )
शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नियमांनुसार, महापालिकेकडे राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर न करण्याचे तंत्र वापरले जात असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. नियमांनुसार, ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असून त्यांचा राजीनामा आयुक्तांपर्यंत न जाता विभागीय पातळीवर मंजूर होणे आवश्यक होते, असे परब म्हणाले.
ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी आपल्या लिपीक पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर सेवा समाप्तीस एक महिना पूर्ण होत नसल्यास एक महिन्याचा पगार कोषागरात जमा करावा लागतो. ऋतुजा लटके यांनी सर्व कागदपत्रे सादर केली असून त्यांची फाइल तयार आहे. मात्र, त्यांचा राजीनामा चुकीच्या पद्धतीने असता तर त्याचवेळेस त्यांना कल्पना का दिली गेली नाही, असा प्रश्न परब यांनी उपस्थित केला.
महापालिका आयुक्तांवर दबाव
शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. आपण स्वत: महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ऋतुजा लटके या तृतीय श्रेणातील पालिका कर्मचारी आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्तांना आहे. तरी देखील हे प्रकरण आयुक्तांकडे कसे गेले, असा सवालही परब यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community