ठाकरेंची ‘मशाल’ पुन्हा संकटात?

173
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून उद्धव ठाकरे गटाला मशाल, तर एकनाथ शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हाचा जोरदार प्रचार सुरू असताना, त्यांची ‘मशाल’ पुन्हा एकदा संकटात आली आहे.
समता पार्टीने पुन्हा एकदा मशाल चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. त्याला उत्तर प्रदेशमधील निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. निवडणूक आयोगाने समता पक्षाला उत्तर प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीसाठी मशाल चिन्ह दिले आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रातही आम्हाला मशाल चिन्ह मिळावे, अशी अपेक्षा समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तृणाल देवळेकर यांनी व्यक्त केली. चिन्ह परत मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. न्यायालयाने आमची याचिका फेटाळली असली, तरी येत्या १२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यामुळे एकीकडे पक्षाची नव्याने बांधणी करण्याची कसरत सुरू असताना, नव्या चिन्हावरही दावा सांगण्यात आल्याने ठाकरेंची ‘मशाल’ पुन्हा संकटात आल्याचे बोलले जात आहे.

प्रकरण काय?

ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर समता पार्टीने यावर हरकत घेतली होती. १९९४ पासून मशाल हे चिन्ह आमचे आहे, असा दावा त्यांनी केला होता. समता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे निवेदन देण्यात आले. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. याचदरम्यान उत्तर प्रदेशमध्ये जाहीर झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ तारखेला राजकीय पक्षांना चिन्हवाटप करण्यात आले. त्यात समता पक्षाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.