ठाकरे गट आणि मनसेच्या साडे तीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

193

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. कारण ठाकरे गटाचे आणि मनसेचे तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील आहेत. हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही एका विश्वासाने आला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचे, आमचे सगळ्यांचे आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. या सरकारमध्ये 170 आमदारांचे मजबूत बहुमत आहे. काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. त्यांना पोटशूळ उठलेले आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढं काम करत आहे, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहीलं तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असा खोचक टोलाही शिंदेंनी केला.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो हवाच! )

शिंदेंचा विरोधकांना टोला

दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील, असे बोलत आहेत. अरे तुमचे लाॅजिक काय असा सवालही शिंदेंनी केला. या सरकारकडे 170 आमदारांचे बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेत आहे. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीत काहीही आलबेल दिसत नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.