शिवसेनेला सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुषमा अंधारे यांना आयात करून त्यांना उपनेत्या बनवल्यानंतर पक्षातील महिला नेत्यांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. अंधारे आणि उपनेत्या संजना घाडी यांचा एक गट तर उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मीना कांबळी, विशाखा राऊत यांचा दुसरा गट बनला आहे. महिला नेत्यांच्या या गटबाजीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या अस्वस्थ असून त्यांनी अप्रत्यक्ष त्यांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी ‘मातोश्री’वर दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वीच काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या दक्षिण मुंबईतील आशा मामुडी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. याचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत, तुमच्या आपआपसातल्या स्पर्धेपायी आपण चांगली माणसे गमावत आहोत, असेच खडे बोल सुनावत अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंनी पक्षातल्या महिला नेत्यांचे कान टोचले.
पक्षातल्या महिला नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या गटबाजीची उद्धव ठाकरेंनी दखल घेतली. पक्षाच्या उपनेतेपदी नुकतीच वर्णी लागलेल्या दक्षिण मुंबईतील आशा मामिडी यांनी बैठकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. महिला आघाडीतील गटबाजीचा परिणाम असल्याची नाराजी त्यांनी मांडली. आशा मामिडी यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर थेट बोलणे टाळत महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या गटबाजीवर त्यांनी भाष्य केले.
अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांच्या पक्षातील वाढत्या वजनामुळे ठाकरे गटातील महिला आघाडी अस्वस्थ आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर लागलीच सुषमा अंधारे यांची उपनेते पदावर वर्णी लागली आणि तशीच त्यांच्या राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचीही जोरदार चर्चा आहे. एकीकडे सुषमा अंधारे आणि संजना घाडी तर दुसरीकडे डॉक्टर नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, मीना कांबळी, विशाखा राऊत अशी गटबाजी दिसून येत आहे. त्यामुळे महिला आघाडीतील गटबाजीची रश्मी ठाकरे यांनीही दखल घेतल्याचे बोलले जात आहे. कारण दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.
( हेही वाचा: गोखले पुलावरील हलक्या वाहतुकीचा निर्णय पुढील दिवसांमध्ये : दोन्ही संस्थांच्या अहवालाचा सुरु आहे अभ्यास )
आशा मामुडी या मनसेतून शिवसेनेत परत आल्या असल्या तरी त्या जुन्या शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील आक्रमकता पाहून पक्षाने त्यांची वर्णी उपनेते पदी लावली होती. परंतु मामुडी यांना पक्षाच्या जुन्या उपनेत्या त्यांना स्वीकारायला तयार नव्हत्या. त्यामुळे महिला आघाडीतील अंतर्गत लढाई आणि हेवेदावे यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी दहिसरच्या शीतल म्हात्रे, विक्रोळीतील संध्या वढावकर आदी मुंबईतील महिला पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
Join Our WhatsApp Community