महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने अधिवेशनाचे तात्पुरते कामकाज जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार हिवाळी अधिवेशनाचे एकूण कामकाज दहा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
संसदीय कामकाज विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांत अध्यादेश पटलावर ठेवण्यात येणार असून सन २०२२ – २०२३ च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. मंगळवार, २० आणि बुधवारी २१ डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांत शासकीय कामकाज पार पडणार आहे. गुरुवार, २२ डिसेंबर रोजी पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेण्यात येईल.
२३ डिसेंबरला अशासकीय कामकाजाव्यतिरिक्त पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाणार असून याच दिवशी पुरवणी विनियोजन विधेयकसुद्धा सादर करण्यात येणार आहे.
दुसऱ्या आठवड्याचे वेळापत्रक
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात २६ ते ३० डिसेंबरच्या कालावधीत दोन्ही सभागृहांत शासकीय कामकाज होईल. विभागाने जाहीर केलेल्या कामकाजानुसार एकूण दहा दिवस अधिवेशनाचे काम चालणार आहे. दरम्यान, विभागाने जाहीर केलेले हे कामकाज तात्पुरत्या स्वरूपाचे असल्याची माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community