उद्धवसेनेवर आता लाल रंगाची झालर; भाजपाची बोचरी टीका

132
हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी राजकीय नेत्यांनी आखला आहे. कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा हा त्या कटाचाच एक भाग असून आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना या कटात पुरती फसली आहे. शिवसेनेचा भगवा रंग आता लाल झाला आहे, अशी टीका प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. शिवसेनेने उद्या ‘एमआयएम’चा पाठिंबा घेतला तरी आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.
मुंबईतील कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर शिवसेनेने मुंबईत पाय रोवले होते. कम्युनिस्टांचा प्रभाव संपवणाऱ्या त्याच शिवसेनेवर कम्युनिस्टांचा पाठिंबा घेण्याची वेळ यावी, हा काळाने उगवलेला सूड आहे. राजकीय पक्षांना आव्हान देणाऱ्या शिवसेनेकडे हिंदुत्वाच्या विचाराची शक्ती असून ती शक्तीच काढून घेण्याचा एक व्यापक कट या विरोधकांनी रचला. त्याचाच भाग म्हणून अगोदर उद्धव ठाकरे यांचे गोडवे गायिले गेले. मग त्यांना पाठिंबा देऊन हिंदुत्वापासून दूर ओढले गेले. आता ठाकरेंची शिवसेना या कटात पुरती फसल्याचे स्पष्ट झाल्यावर याच कटाचा पुढचा अंक म्हणून उद्धव ठाकरेंना सहानुभूती दाखवण्याचा कांगावा सुरू आहे. आता ठाकरेंची शिवसेना यात पुरती फसल्याचे लक्षात येताच माघारीचे प्रयत्नही करून झाले, पण त्यामध्ये यश न आल्याने हिंदुत्वविरोधी पक्षांचा फसवा आधार घेऊन तगण्याची धडपड सुरू आहे, अशी घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली.
हिंदुत्वावर न बोलण्याची अट..!
हिंदुत्व सोडल्यावर शिवसेनेचा भगवा रंग संपला आणि ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा रंग शिवसेनेने दाखविला. संभाजी ब्रिगेडसोबत गेल्यावर सावरकरांवर बोलणे बंद झाले. आता तर हिंदुत्वावर न बोलण्याच्या अटीवरच कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला असून, ती अट मान्य केली गेल्याची आमची माहिती आहे, असे उपाध्ये म्हणाले. मित्र म्हणवणाऱ्या या सहानुभूतीदार पक्षांनी आता ठाकरे यांचे पंख पुरते छाटले असून परतीचा मार्गदेखील बंद केला आहे, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.