राज्यसभा निवडणुकीचा चित्तथरारक निकाल, कोल्हापूरच्या ‘या’ मल्लानं अखेर मारलं मैदान! वाचा संपूर्ण आकडेवारी

93

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘न भूतो न भविष्यति’ ठरलेल्या राज्यसभा निवडणूक 2022 चा निकाल अखेर लागला आहे. मतदानावर घेतलेल्या आक्षेपांमुळे राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी मतमोजणी प्रक्रिया तब्बल साडे आठ तास रखडली होती. पण अखेर या नाट्यमय आणि थरारक निवडणुकीचा निकाल हाती आला असून, यामध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल,इम्रान प्रतापगढी यांनी बाजी मारली आहे. तर भाजपच्या पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिन्ही उमेदवारांनी ही लढाई जिंकली आहे.

शिवसेनेच्या संजय पवार यांचा दारुण पराभव झाल्यामुळे मविआ आणि शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या या दोन्ही मल्लांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी मैदान मारलं असून, शिवसेनेच्या संजय पवार यांना त्यांनी असमान दाखवलं आहे. त्यामुळे प्रतिष्ठेची ही झुंज अखेर जिंकल्यामुळे विधान भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

कोणाला किती मते?

महाविकास आघाडी

प्रफुल्ल पटेल(राष्ट्रवादी काँग्रेस)- 43

इम्रान प्रतापगढी(काँग्रेस)- 44

संजय राऊत(शिवसेना)-41

संजय पवार(शिवसेना)-33

भाजप

पीयूष गोयल-48

अनिल बोंडे-48

धनंजय महाडिक-41

मतदानावर आक्षेपांचा शिक्का

मतदान प्रक्रियेच्या वेळी महाविकास आघाडी आणि भाजप यांनी परस्परांच्या आमदारांच्या मतदानप्रक्रियेवर आक्षेप घेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड,काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली. तर महाविकास आघाडीने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार व अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेऊन, ती मते रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. यामध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान भवनातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाद ठरवले. त्यामुळे अखेर 284 वैध मतांच्या मतमोजणीला तब्बल साडे आठ तासांनंतर सुरुवात झाली.

एकेका मतासाठी शह-काटशह

एखाद्या क्रिकेटचा अटीतटीचा सामना रंगावा, अशी राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात रंगतदार झाली. निवडणुकीची घोषणा झाल्यावर सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ६व्या जागेसाठी उमेदवार देणार असल्याचे घोषित केले, त्यासाठी शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपनेही धनंजय महाडिक यांच्या रुपाने आपला तिसरा उमेदवार दिल्याने तब्बल 24 वर्षांनंतर महाराष्ट्रात ही निवडणूक चुरशीची झाली. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांनी अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांना गळाला लावण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

अपक्षांनी भूमिका ठेवली गुलदस्त्यात

मात्र, याचाच फायदा अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी घेतला आणि अखेरपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी त्यांची भूमिका शेवटपर्यंत सांगितली नाही. या परिस्थितीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानासाठी न्यायालयाने जामीन दिला नाही, तसेच शिवसेनेचे आमदार रमेश लटके दिवंगत झाल्याने महाविकास आघाडीची तीन मते कमी झाली. त्यामुळे एकूण 288 आमदारांकडून होणा-या या मतदानाची संख्या 285 झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात सुहास कांदेंचं एक मत बाद झाल्यामुळे अखेर 284 मतांची मोजणी होऊन निकाल हाती आला.

अखेर महाराष्ट्राला जागवणा-या या हाय व्होल्टेज राज्यसभा निवडणुकीची ही चित्तथरारक लढाई आता संपली असून, विजयी उमेदवारांसाठी निकालाची रात्र ही सोनेरी पहाट आणणारी ठरली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.