महाराष्ट्राचा चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार – सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

134

नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी द्वितीय पारितोषिक मिळविलेला महाराष्ट्राचा “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा चित्ररथ राज्यातील साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेच्या माध्यमाने नेण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केली.

दिल्लीतील चित्ररथासोबत कर्तव्यपथावर संचलनात गोंधळ सादर करण्यात आला होता. दिल्लीतील संचलनात गोंधळी समाजाला प्रथमच संधी मिळाली त्याबद्दल अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने सुधीर मुनगंटीवार यांचा शुक्रवारी मंत्रालयात सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत दिल्लीच्या कर्तव्य पथावर जे चित्ररथ दिसले ते फक्त टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दिसले. त्यामुळे माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्रृंगी माता या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी रथयात्रेच्या माध्यमातून हा चित्ररथ नेण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा Bmc budget 2023-24 : कोणतीही दरवाढ, करवाढ नसणारा तसेच शुल्क माफ करणारा असेल महापालिकेचा अर्थसंकल्प)

गोंधळी समाजामध्ये असणारे जे जे लोककलावंत आहेत ज्यांनी ज्यांनी या समाजाला प्रगत करण्यामध्ये, उन्नत करण्यामध्ये सामाजिक जाणिव ठेवून समरसता निर्माण केली त्या सर्वांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या वतीने सादर केलेल्या “साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती” या चित्ररथाला त्यासोबत सादर केलेल्या गोंधळाच्या सादरीकरणाने अधिकच उठाव आला, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. या बैठकीदरम्यान अखिल भारतीय गोंधळी समाज कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे, कर्नाटक गोंधळी समाज प्रदेशाध्यक्ष सिद्राम वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.