- वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ओरिसातील भाजपाच्या खासदारांना महाराष्ट्रापासून धडा घेण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची सुरुवात केली आहे. मात्र, भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची महायुती या योजनेचे श्रेय घेईल; त्यापूर्वीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) राज्यात ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार-प्रसार केला पाहिजे, असा सल्ला सुद्धा पंतप्रधानांनी यावेळी खासदारांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवीन संसदेतील कॉन्फरन्स रूममध्ये ओरिसातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांशी चर्चा केली. ओरिसा विधानसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीसोबतच झाली होती. यात ओरिसातील लोकांना भाजपाच्या हाती राज्याची सत्ता दिली आणि भाजपाच्या २० खासदारांना लोकसभेत निवडून पाठविले. पंतप्रधान मोदी यांनी ओरिसातील २१ खासदारांशी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली. पंतप्रधान प्रत्येक राज्यातील खासदारांशी चर्चा करीत असतात. मंगळवारची बैठक सुद्धा त्याचाच एक भाग होती.
(हेही वाचा – भाजपातर्फे राज्यभर Har Ghar Tiranga; एक कोटी घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प)
भाजपातील विश्वसनीय सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, ओरिसातील भाजपा खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे दाखले दिलेत. पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आणि त्यासाठी ४६०० कोटी रूपयाची भरीव तरतूद केली. मात्र, महायुती सरकारच्या या योजनेचे श्रेय महाविकास आघाडी घेत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) महाराष्ट्रात ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून ही योजना त्यांच्यामुळे कार्यान्वित झाली असल्याचे सांगितले. यामुळे ही योजना विरोधकांमुळेच लागू झाली असा समज लोकांचा झाला आहे’, असे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) या बैठकीत सांगितले.
यामुळे, केंद्र सरकार आणि रालोआशासित राज्यांतील सरकारच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी सर्वांनी लोकांच्या संपर्कात रहायला पाहिजे. सोशल मिडियाचा वापर जास्तीत जास्त करावा. एवढेच नव्हे तर, पंतप्रधानांनी ‘टिफिन-मिटींग’ करण्याचा सल्ला सुद्धा ओरिसातील खासदारांना दिला, अशी माहिती सूत्राने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community