पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे! विरोधकांनी केला हल्लाबोल

सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आली नसल्यामुळे, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस राज्यात पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले अनिल परब?

राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे अहवाल बघता, तसेच नवीन स्ट्रेनचा धोकाही असल्यामुळे, पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवस घेण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. या अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी प्रश्न होणार नाहीत. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत कामकाज कार्यक्रम पत्रिकेत ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः परमबीर सिंगांना चांदीवाल आयोगाकडून दंड! )

महाविकास आघाडीत समन्वय

महाविकास आघाडीत भांड्याला भांडं वाजत असल्याची चर्चा होत असताना, अनिल परब यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये पूर्ण समन्वय असून, हे तिन्ही पक्ष एकत्र उत्तमरित्या काम करत आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले.

फडणवीसांची टीका

केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, अशी सरकारची मानसिकता आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न विचारू नयेत, असा सरकारचा डाव आहे. राज्यात शेतक-यांसमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. आठ-आठ दिवस राज्यातील जनतेला वीजेशिवाय राहावे लागत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे, तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न असताना सुद्धा राज्य सरकार हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळत आहे. त्यामुळे हा सरकार आहे की तमाशा, असा झणझणीत सवाल फडणवीसांनी केला आहे.

(हेही वाचाः देशमुखांच्या चौकशीत राज्य सरकार सहकार्य करेना… सीबीआयचा न्यायालयात दावा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here