सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग त्यानुसार कामाला लागले असून, त्यांनी आता राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत.
11 मेपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करावे. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
राज्यातील एकूण 14 शहरांतील महापालिका निवडणुका या प्रलंबित आहेत. यामध्ये मुंबईसारख्या अनेक महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन तारखा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 11 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे काम पूर्ण करुन, 12 मे पर्यंत त्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावा. 17 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दोन टप्प्यांत होणार निवडणुका?
या महापालिका निवडणुका या दोन टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस आणि निवडणुकीसाठी कर्मचा-यांवर येणारा ताण यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले जात आहे. ज्या महापालिकांची मुदत संपून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, त्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, तर इतर महापालिका निवडणुका दुस-या टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.
या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित
नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या 14 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत.
Join Our WhatsApp Community