राज्य सरकार हतबल, केंद्राच्या पाया पडायलाही तयार!

राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून, आता ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र आता राज्याला ऑक्सिजन मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार असल्याचे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले टोपे

राज्य सराकर केंद्र सरकारला अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचे वाटप, केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करुन महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना, महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

(हेही वाचाः राज्याला ५० हजार रेमडेसिवीरची गरज, केंद्राकडून २६ हजाराचा पुरवठा! नवाब मलिकांचा आरोप)

केंद्राकडे मदतीचा हात

नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत, असे देखील ते म्हणाले.

राज्याला रोज मिळणार 26 हजार रेमडेसिवीर

राज्याला रोजकेंद्र सरकारकडून 26 हजार रेमडेसिवीर मिळणार असल्याचे सांगत, केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यासमोर अडचण निर्माण झाल्याचे टोपे म्हणाले. यामुळे रोज १० हजार रेमडेसिवीरची कमतरता भासणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.  रेमडेसिवीरबाबत तोडगा काढणे गरजेचे असून, रेमडेसिवीर सात कंपन्या बनवतात. त्यापैकी सीरमच्या आदर पुनावाला यांनी सांगितले की, त्यांचं पूर्ण प्रोडक्शन येत्या २४ मेपर्यंत केंद्राने बूक केले. त्यामुळे आपण सध्या ते विकत घेऊ शकत नसल्याचे, टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here