अलिकडेच कुंकू-टिकलीवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत संभाजी भिडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार असल्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्यावरुच सर्वच स्तरांतून टीका होत असतानाच आता राज्य महिला आयोगाकडून भिडेंना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे.
महिला आयोगाकडून बजावण्यात आलेल्या पहिल्या नोटिसीला भिडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे राज्य महिला आयोगाने त्यांना दुसरी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये संभाजी भिडे यांना उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
…अन्यथा एकतर्फी कारवाई होणार
महिला पत्रकाराला प्रतिक्रिया देताना संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने भिडे यांना 2 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. पण त्यावर कोणतेही उत्तर न आल्याने राज्य महिला आयोगाकडून भिडेंना दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीला दिलेल्या मर्यादित वेळेत भिडे यांनी उत्तर न दिल्यास, त्यांचे या प्रकरणी काही एक म्हणणे नसल्याचे गृहीत धरण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 7, 2022
काय आहे प्रकरण?
भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भिडे यांनी, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रुप आहे. आपली भारतमाता विधवा नाही. तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या विधानामुळे राज्यात वाद निर्माण झाला असून राजकीय नेत्यांनीही भिंडेवर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community