राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकींचा निकाल अखेर लागला आहे. एकूण 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण 11 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. भाजपचे पाच, तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे मिळून 6 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपला करिश्मा दाखवत विधान परिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडवून आणला आहे.
10 उमेदवारांसाठी 285 आमदारांनी मतदान केले होते. काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर घेतलेल्या आक्षेपामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल दोन तास उशीर झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यामुळे 283 वैध मतांमधून हा निकाल लागला आहे.
भाजपचे ‘लाड’
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, तर भाजपच्या पाचपैकी सर्व उमेदवार राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा दारुण पराभव झाला आहे. प्रसाद लाड यांना 28 मते मिळाली असून, चंद्रकांत हंडोरे यांना 22 मते मिळाली आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद लाड यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
कोणाला किती मते?
महाविकास आघाडी
शिवसेना
सचिन अहिर-26
आमशा पाडवी-26
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे- 29
रामराजे निंबाळकर- 28
काँग्रेस
चंद्रकांत हंडोरे- 22
भाई जगताप- 26
भाजप
श्रीकांत भारतीय- 30
प्रवीण दरेकर-29
राम शिंदे- 30
उमा खापरे- 27
प्रसाद लाड- 26
असे होणार पक्षीय बलाबल
या निकालामुळे आता विधान परिषदेतील पक्षीय बलाबलात बदल झाला आहे.
भाजप – २४
शिवसेना – १४
राष्ट्रवादी काँग्रेस – १०
काँग्रेस – १०
शेकाप – २
राष्ट्रीय समाज पक्ष – १
अपक्ष – ५
राज्यपाल नियुक्त (रिक्त) – १२