पंजाच्या पकडीतील ‘मशाल’ महाराष्ट्र स्वीकारणार नाही; बावनकुळे यांची खरमरीत टीका

130
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली.
बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना राजकीय लाभ होणार नाही. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारत आपल्या पक्षाचे व कार्यकर्त्यांचे प्रचंड नुकसान केले. शिवसेनेचा पक्ष का फुटला व त्या पक्षातून खासदार – आमदार का बाहेर पडले याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्या पक्षातील घडामोडींना भाजपा जबाबदार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक कार्यकर्त्याला वीस घरांची जबाबदारी

  • भारतीय जनता पार्टीची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाच्या जोरावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची युती आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवेल.
  • मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास करत आहोत. भंडारा हा आपला प्रवासाचा १९ वा जिल्हा आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण भाजपाचा संघटनात्मक प्रवास करणार आहोत.
  • भाजपाने राज्यातील केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून ‘धन्यवाद मोदी’, अशी लाभार्थ्यांच्या हस्ताक्षरातील पंधरा लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बूथस्तरावर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम चालू आहे.
  • प्रत्येक कार्यकर्त्याला वीस घरांची जबाबदारी देऊन सरकारच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी काम करण्यात येत आहे. तसेच राज्यभर विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.