महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी गोरेगाव येथे उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. आज आपण सुरुवात केली आहे, पुढे आणखी बैठका होतील. त्यानंतर आपली सभा होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, मैदानात समोर या असेही ठाकरे म्हणाले.
पार्सल माघारी गेले!
उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचे पार्सल माघारी जात आहेत,’ असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
‘लोकांना दिल की बात हवीय’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उत्तर भारतीय नागरिकांशी संवाद मेळावा गोरेगावमध्ये झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बातवरुन टोला लगावला. तसेच उत्तर भारतीयांशी शिवसेनेचे नाते मजबूत करण्यासाठी मी आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर भारतीयांचा मेळावा नसून ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल, असेही ते म्हणाले. लोकांना आता मन की बात नको असून दिल की बात हवीय, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘पोळी’ भाजली
आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास प्रवृत्त, मजबूर करण्यात आले. आज काही जण गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, त्यांनी जे केले ते जर मी केले असते तर हिंदुत्व सोडले असल्याचा आरोप केला असता. बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोळी भाजून घेतली. पण मुंबईतील बोहरा समाजाचे लोक शिवसेनेसोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व
आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे हे माझे वडीलही सांगून गेले, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, ह्रदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. हिंदु जेव्हा झोपले होते तेव्हा माझ्या वडीलांनी त्यांना जागे केले आणि त्याचा लाभ भाजप घेत आहे.
Join Our WhatsApp Community