आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय, अशी टॅग लाईन देत खासदार संभाजी राजे यांनी आजपासून मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या मोर्चाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारीच मुंबईत या, असे संभाजी राजेंना निमंत्रण दिले आहे.
काय म्हणाले सतेज पाटील?
राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचे कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समन्वयाची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे. राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून, मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची आहे. उद्या तुम्ही मुंबईलाला यावे, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवे. संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ, राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
(हेही वाचाः संभाजी राजेंच्या मूक आंदोलनाला सर्व पक्षीय पाठिंबा! )
आरक्षणासाठी लोकसभेचे अधिवेशन व्हायला हवे
मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन. पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले. आरक्षण कोणामुळे थांबले, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही, हा समाजाला प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं, असं धैर्यशील माने म्हणाले. महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केले आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले. हे पाऊल निश्चितपणे यशस्वी होईल. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल, असे धैर्यशील माने म्हणाले. न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला आहे. हा राज्याचा की केंद्राचा, असा प्रश्न समाजाला पडल्याचे ते म्हणाले.
हाताला सलाईन तरी मोर्चात सहभागी
खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अशक्तपणा असल्याने ते घरात उपचार घेत होते, 10 दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज मिळाला. मात्र मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रकृती नाजूक असतानाही ते सलाईन लावून सहभागी झाले.
(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्ती हाच उपाय! छत्रपती शाहू महाराजांची सूचना )
Join Our WhatsApp Community