शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे देण्यास काँग्रेससह राष्ट्रवादी अनुकुल असताना, एकाएकी शरद पवार यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे ‘मविआ’ची वज्रमूठ ढिली पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्धवसेना आणि काँग्रेसची कोंडी झाली असून, पडद्यामागे अनपेक्षित हालचालींना वेग आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांत भाजपला पोषक ठरतील अशी विधाने केली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तेथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. शिवसेनेचे १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत… तेही लवकरच’, अशा आशयाचे ट्विट दमानिया यांनी केले आहे. मात्र, त्यामुळे उद्धवसेना आणि काँग्रेसच्या पोटात मोठा गोळा आला आहे.
पवारांच्या बदलत्या स्वरांचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी तातडीने ‘सिल्वर ओक’ गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ काळ चर्चा झाली. त्यापाठोपाठ आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. येत्या काही दिवसांत काँग्रेसचा दिल्लीतील एक बडा नेता मुंबईत येऊन पवार- ठाकरेंची भेट घेणार आहे. या साऱ्या घडामोडी, पडद्यामागे काहीतरी मोठ्या हालचाली सुरू असल्याकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’ने याचा कानोसा घेतला असता, येत्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्ष आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भाजपा राष्ट्रवादीला जवळ करू पाहत आहे, इतकाच याचा मतितार्थ काढणे उचित ठरणार नाही. तर येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी त्याला आहे. भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवसेना एकत्र लढली, तर लोकसभेला शिवसेना-भाजपा युतीला ३५ हून अधिक जागा मिळणार नाहीत. शिवाय एकट्या शिंदेंच्या भरवशावर विधानसभेला पूर्ण बहुमत मिळणे आजमितीला तरी शक्य नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीचा आधारस्तंभ असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतले, तर विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या होतील. एकीकडे भाजपाकडून सातत्याने हिंदुत्वाची ढाल पुढे केली जात असताना, स्वतःला पुरोगामी म्हणवणारा राष्ट्रवादी पक्ष सोबत घ्यायचा की, त्या पक्षातील एका गटाशी जुळवून घ्यायचे, यावर सध्या खल सुरू आहे.
अजित पवार गटाशी जुळवून घेण्यास देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेते देखील अनुकूल आहेत. अजित पवार दोन दिवस ‘नॉट रीचेबल’ असण्यामागचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. पुढे काय होणार? भाजपामधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतक्या लवकर फुटाफुटीच्या कोणत्याही घटना घडणार नाहीत. सध्या केवळ प्राथमिक चर्चा सुरू आहेत. सत्ता नसल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक आमदार चलबिचल झाले आहेत. त्यातील काहींनी भाजपाशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे.
परिणामी, पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेता उद्धव ठाकरेंसारखी होणारी अवस्था टाळण्यासाठी पवार कुटुंबातील एक बडा नेता भाजपासोबत जाण्यास अनुकूल आहे. मात्र, राष्ट्रवादीला सोबत घेतल्यास जागा आणि सत्तावाटपाचा तिढा उद्भवू शकतो, याची जाणीव भाजपाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णयाबाबत सध्या खल सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
थोरात-पटोले गटात मतभेद
पंतप्रधान मोदींची पदवी, अदानी या मुद्द्यांवरून काँग्रेसच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेवरून प्रदेश काँग्रेसमध्ये पटोले आणि थोरात गटांत मतभेद सुरू झाले आहेत. उद्योगपती अदानी यांच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबतचा विषय राजकीय मुद्दा होऊ शकत नाही, अशी पाठराखण केली.
राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक टीका केली. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने १५० हून अधिक ठिकाणी हातमिळवणी केली असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.- मात्र, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे नाराज आहेत.
भाजपला टक्कर देण्यासाठी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची महाविकास आघाडी मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर उघडपणे टीका करण्यात येऊ नये, अशी थोरात यांची भूमिका आहे. थोरात गटाने पटोले यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसविरोधातील टीकेबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडक शब्दांत टीका करणाऱ्या पटोले यांची भाषा मवाळ झाल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचा – पाथर्डीतूनच विधानसभेची तयारी करा; भाजपाची पंकजा मुंडेंना स्पष्ट सूचना?)
Join Our WhatsApp Community