महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का?; भाजपाचा सवाल

128

राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का, असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळेच बेळगाव महाराष्ट्रात येऊ शकले नाही, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘…कदापि खपवून घेणार नाही’)

यावेळी उपाध्ये यांनी बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग महाराष्ट्रात सामील करावा यासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व केलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या मी एस.एम. या आत्मचरित्रातील सीमा लढ्याविषयीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. आपल्या आत्मचरित्रात एस.एम. जोशी यांनी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे सीमा प्रश्न सुटला नाही असे अनेक उदाहरणे देऊन दाखवून दिले आहे. एकही खेडं कर्नाटकला दिले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तरीही महाविकास आघाडीचे नेते कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळविणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खोटारडेपणा उघडा पडला

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळवले जात असल्याचा खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला होता. मात्र हा खोटेपणा तत्काळ उघडा पडला. आता कर्नाटक महाराष्ट्राची खेडी पळविणार असल्याची आवई उठवली जात आहे. या घटनांतून महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारीच घेतली आहे असे दिसते आहे. या या विषयावर राजकारण करून महाविकास आघाडीने आपला संकुचितपणाच दाखवून दिला आहे, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.