महाविकास आघाडीला वाटते गुप्त मतदानाची भीती?

ऐनवेळी दगा फटका झाला तर काय? असा प्रश्न ठाकरे सरकार समोर आहे.

69

राज्यात सध्या विधानसभा अध्यक्ष निवडीची चर्चा जोरदार सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केल्यानंतर आता राज्य सरकारने त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाद्वारे होणार असल्याने राज्य सरकार आतापासूनच सावध पवित्रा घेत असून, ठाकरे सरकारच्या सध्या जोर बैठका सुरू आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने मते फुटून नाचक्की होऊ नये, यासाठी आतापासूनच चाचपणी झाली आहे. तर भाजपकडून देखील उमेदवार दिला जाणार असून, भाजपने देखील अंतर्गत हालचाली सुरू केल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

म्हणून वाटते गुप्त मतदानाची भिती

अध्यक्षपदाची निवडणूक ही हात उंचावून घेतली जात नाही, तर ती गुप्त मतदानाने घेतली जाते. मतदानास हजर राहण्याचा ‘व्हिप’ जारी करण्याचा अधिकार पक्ष प्रतोदाला असला, तरी मतदान पक्ष किंवा आघाडीलाच करावे याबाबत ‘व्हिप’ काढता येत नाही. काढला गेलाच तर तो पाळणे बंधनकारक नसते. कोणत्याही आमदाराने पक्षादेश झुगारुन मतदान केले, तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार प्रतोदाला नाहीत. त्यामुळे ऐनवेळी दगा फटका झाला तर काय? असा प्रश्न देखील ठाकरे सरकार समोर आहे.

(हेही वाचाः अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी, शिवसेना आमदारांना व्हिप जारी)

तर करायचे काय?

राज्यात आजही कोरोनाचे संकट कायम असून, मागील पावसाळी अधिवेशनापूर्वी तब्बल २१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये काही मंत्री आणि आमदारांचा देखील समावेश होता. यावेळी देखील कोरोनाचे संकट कायम असून, डेल्टा प्लस हा नवा विषाणू राज्यात आला आहे. त्यातच अधिवेशानाआधी सर्व आमदारांची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे जर काही आमदार पॉझिटिव्ह आले तर करायचे काय? याचा विचार देखील ठाकरे सरकार करत आहे.

(हेही वाचाः दोन दिवसांचे अधिवेशन कोरोनासाठी की बचावासाठी?)

राष्ट्रवादीला हवा मर्जीतला अध्यक्ष

विधानसभा अध्यक्ष कोण असणार यावरुन सध्या तिन्ही पक्षांत जोर बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीला आपल्या मर्जीतला अध्यक्ष हवा असल्याची चर्चा सुरू ऐकायला मिळत आहे. राष्ट्रवादीने आधीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध केला असून, आता काँग्रेस कोण उमेदवार विधानसभा अध्यक्ष पदासाठी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसने व्हिप जारी केला असला, तरी राष्ट्रवादीने अजून व्हिप जारी का केला नाही? असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.

(हेही वाचाः दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजप मैदान मारणार? अशी आहे रणनीती)

अशी असते विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया

विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया नेमकी कशाप्रकारे पार पडते याविषयी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सांगतात की, विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणे बंधनकारक असते, तसेच हे मतदान गुप्त पद्धतीने केले जाते.

असे आहे संख्याबळ

शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 43

महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष

बहुजन विकास आघाडी – 3
समाजवादी पार्टी – 2
प्रहार जनशक्ती पार्टी – 2
माकप – 1
शेकाप – 1
स्वाभिमानी पक्ष – 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1
अपक्ष – 8

भाजपचे संख्याबळ

भाजप – 106
जनसुराज्य शक्ती – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 5
एकूण – 113

तटस्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
एमआयएम – 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.