माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीचा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. चौकशीसाठी विधिमंडळाची 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यास विधानसभेने मंजुरी देखील दिली होती. मात्र, या चौकशीसाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विशेष म्हणजे आता तर तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे देखील या चौकशीला ब्रेक लागल्याची माहिती, वन खात्यातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
…म्हणून चौकशीसाठी वेळ मिळेना
संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारने समिती नेमली होती. मात्र राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पहिली, दुसरी लाट ओसरत असताना, तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करणे सध्यातरी शक्य नसल्याचे वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचाः राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी ८ महिने लागायची गरज नाही!)
शिवसेनेच्या या आमदाराचा आरोप
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची योजना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आखली. वृक्ष संगोपनासाठी कोट्यावधींच्या निधीची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्षभरापूर्वी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना आमदार रमेश कोरगांवकर यांनी हा निधी वापरलाच नसल्याचा गंभीर आरोप केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी लाऊन धरली.
पटोलेंनी केली होती चौकशीची मागणी
वृक्ष लागवड हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली होती. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून झाडे खरेदी केली गेली, याची माहिती समोर आली पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी १६ जणांची समिती नेमण्याचे आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले होते. तसेच पुढील चार महिन्यांत पाहणी करुन चौकशी करण्यात येईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले होते.
(हेही वाचाः मंदिरासाठी बोंबाबोंब म्हणजे ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’!)
वृक्ष लागवडीसाठी इतका खर्च
महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी 2014 ते 2019 या कालावधीत 2 हजार 429 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community