सध्या राज्यातील महाविकास सरकारमध्ये मतभेदाचे वारे वाहत आहेत. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आधीच अर्थसंकल्पात निधी वाटपात भेदभाव केल्याच्या आरोपामुळे नाराजी आहे, अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या खात्यांकडे झुकते माप दिले आहे. आता त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. यामध्ये एका बाजूला केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नात्यांवर कारवाई करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते मात्र भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात कुचराई करत आहे, त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात गृहखात्यावरून चांगलीच जुंपली आहे.
गृहखाते सेनेने घेण्याची मागणी
शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधीच भाजप नेते किरीट सोमय्या आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पुरावे दिले, तरी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे राऊत यांनी आधीच राष्ट्रवादीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती, त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पद स्वत:कडे ठेवले होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
(हेही वाचा मेट्रोच्या लोकार्पणाआधीच भाजप-शिवसेनेत श्रेयवादावरून जुंपली)
केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना तसेच फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतरही गृहमंत्री वळसे पाटील यांनी आक्रमक पद्धतीने पावले न उचलता ‘आस्ते कदम’ भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहखाते आपल्याकडे घ्यावे, असा मतप्रवाह निर्माण झाला. त्याचाच परिपाक म्हणून औरंगाबादचे माजी सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी उघड उघड भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री गृहखात्याच्या कारभारावर नाराजी असल्याची चर्चा असताना शुक्रवारी दुपारी मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची बैठक पार पडली. साधारण तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील वर्षा बंगल्यावरून बाहेर पडल्यावर अवघ्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून एक संदेश प्रसिद्ध करण्यात आला. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे जनसंपर्क खात्याने म्हटले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या कारभारावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस तुर्तास थांबण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community