बुधवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याचबाबतीत पक्षातील प्रमुख नेत्यांची गुरुवारी बैठक घेतली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून राज्यातील सर्व महापालिका आणि इतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा सल्ला पवार यांनी यावेळी दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
सर्वांना एकत्र आणण्याचा सल्ला
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याच संदर्भात मोर्चेबांधणी करण्यासाठी गुरुवारी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री आणि खासदारांची बैठक घेतली. यावेळी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांना एकत्र आणण्याचा सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिल्याचे आव्हाड यांनी माध्यमांना सांगितले.
(हेही वाचाः नाशिकमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या 27 मनसैनिकांना केले हद्दपार)
ओबीसी आरक्षणावर महापालिका ठाम
ओबीसी आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नसताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. याच संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या भूमिकेवर महाविकास आघाडी पहिल्यापासूनच ठाम आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झटणा-या पोलिसांचे आव्हाड यांनी यावेळी आभार मानले आहेत.
(हेही वाचाः पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही काकड आरती लाऊडस्पीकरविना)
Join Our WhatsApp Community