सुजित महामुलकर
पुढील पंचवीस वर्षे राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकेल, अशी वल्गना अडीच-तीन वर्षांपूर्वी करणारे शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी, १० जानेवारी २०२५ या दिवशी राष्ट्रीय पातळीवरील ‘इंडी’ आघाडी (India Alliance) आणि राज्यातील महाविकास आघाडी फुटल्याची जवळपास अधिकृत घोषणाच करून टाकली. इतकेच नव्हे तर या फुटीला कॉंग्रेस पक्ष (Congress party) जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१९ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेला घरोबा हा अनैतिक तसेच विचारधारेला अनुसरून नव्हता, तर निव्वळ सत्तेसाठी केलेली ती तडजोड होती, हेच यावरून स्पष्ट झाले. सत्ता गेली आणि आता आघाडीचे बिंग फुटले. (Mahavikas Aghadi)
खापर एकमेकांवर
राज्यात भाजपाप्रणीत महायुतीला विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर काही दिवस महाविकास आघाडीने स्वप्नभंग झाल्यागत अपयशाचे खापर ‘ईव्हीएम’वर (EVM) फोडण्याचा प्रयत्न केला. बॅलेट पेपरवर प्रती निवडणूक घेत रान पेटवण्याचाही प्रयत्न केला, भाजपावर बेछूट आरोप केले. मात्र, मनातील खदखद अखेर बाहेर आली आणि शुक्रवारी सगळ्यांनाच कंठ फुटला. शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी राज्यातील अपयशाला कॉँग्रेसला जबाबदार धरले, कॉँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी कॉँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि उबाठाचे संजय राऊत यांच्यावर खापर फोडले, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कॉँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
(हेही वाचा – Makar Sankranti : पतंगप्रेमींनी काय खबरदारी घ्यावी?)
विचारधारा, जनमत याला तिलांजली
मुळात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची विचारधारा एक असली, तरी ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं त्यांचं नातं आहे. राष्ट्रवादी (शप) हे कॉँग्रेसचंच अपत्य असल्याने या दोघांमध्ये शिवसेना या पारंपरिक वैचारिक शत्रूचा (राजकीय) समावेश झाला तो दुसऱ्या पारंपरिक शत्रूला (भाजपा) सत्तेपासून खाली खेचण्याच्या उद्देशाने. २०१९ मध्ये भाजपाचे १०५ अधिक १०-१२ अपक्ष आणि शिवसेना (एकसंघ) ५६ असे संख्याबळ असल्याने भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन करणे आणि पाच वर्षे टिकणे सहज शक्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी राज्याच्या राजकारणाला १८० डिग्री कलाटणी दिली आणि राजकारणातील तत्व, निष्ठा, विचारधारा, जनमत याला तिलांजली मिळाल्यासारखे वातावरण राज्यात पसरले.
महाविकास आघाडी पूर्णपणे ढेपाळली
पाच वर्षे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आधीच कोरोना, त्यात सर्वच स्तरांवर म्हणजेच तीन पक्ष, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद, प्रशासन आणि मंत्री यांच्यात समन्वयाचा अभाव, अशा वातावरणात अडीच वर्षे गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेले बंड, त्यापाठोपाठ अजित पवार यांचे ४० आमदार फोडून काकांना (शरद पवार) दिलेले आव्हान. या प्रवासानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने महाविकास आघाडी पूर्णपणे ढेपाळली गेली. त्याची प्रचीती यायला सुरुवात झाली.
(हेही वाचा – Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई)
आमदार-खासदार सांभाळताना नाकीनऊ
शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या गटातील निवडून आलेले आमदार-खासदार सांभाळताना त्यांचे नाकीनऊ येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकशाही मार्गाने विरोधी पक्षनेता निवडून न येण्याइतकी नाचक्की महाविकास आघाडीची झाल्याने, निवडून आल्याचा मनसोक्त आनंदही विजयी उमेदवारांना घेता आला नाही. आता तर त्यांना मतदारसंघात विकासकामांना निधी मिळेल की नाही याची चिंता सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांना सत्तेचा मार्ग खुणावत आहे. विकासकामे केली नाहीत तर ही आमदारकी शेवटची ठरू शकते, याची कल्पना नवनिर्वाचित आमदार-खासदारांना आतापर्यंत आली असावी. एकूणच महाविकास आघाडीला पुढील काळात घरघर नाही लागली, तरच नवल!
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community