Koregaon मतदारसंघात शशिकांत शिंदेंना महेश शिंदेंचे तगडे आव्हान

मागील विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभेत निसटता पराभव स्वीकारणारे शशिकांत शिंदे दोन्ही निवडणुकांचा वचपा काढणार की महेश शिंदे पुन्हा एकदा विकासकामांच्या जोरावर बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

106

कोरेगाव (Koregaon) विधानसभा मतदारसंघात 27 पैकी 10 जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात 17 जण राहिले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे विरूध्द शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे यांच्यातच टफ फाईट होणार आहे. मागील विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभेत निसटता पराभव स्वीकारणारे शशिकांत शिंदे दोन्ही निवडणुकांचा वचपा काढणार की महेश शिंदे पुन्हा एकदा विकासकामांच्या जोरावर बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कोरेगाव (Koregaon) विधानसभा मतदारसंघात 32 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेमध्ये 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 27 पैकी 10 जणांनी माघार घेतल्याने 17 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये 12 अपक्ष आहेत. लोकसभेला तुतारीसारखे पिपाणी हे चिन्ह आणून डाव टाकण्यात आला होता. तोच डाव पलटवण्यासाठी कोरेगाव मतदारसंघात नावसाधर्म्य असणारे उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून आ. महेश संभाजीराजे शिंदे, शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे, रासपचे उमेश चव्हाण, वंचितचे चंद्रकांत कांबळे, रिपब्लिकन सेनेचे संतोष भिसे निवडणूक रिंगणात आहे. तर अनिकेत खताळ, उध्दव कर्णे, तुषार मोतलिंग, दादासाहेब ओव्हाळ, महेश किसन शिंदे, महेश कांबळे, महेश सखाराम शिंदे, महेश संभाजीराव शिंदे, सदाशिव रसाळ, सचिन महाजन, सोमनाथ आवळे, संदीप साबळे हे अपक्ष उमेदवार आखाड्यात आहेत.

(हेही वाचा Patan मध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?)

महेश शिंदेंच्या विकासकामांचा परिणाम 

2019 च्या निवडणुकीत नवख्या असणाऱ्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा निसटत्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवाची चर्चा रंगली होती. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी जनसंपर्कावर भर देत संघटन मजबूत केले. दरम्यानच्या कालावधीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली. शिवसेनेचे महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून सत्तेत प्रवेश केला. तर आ. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा दाखवत पवारांच्या सोबत राहिले. गत पाच वर्षाच्या कालावधीत या दोन्ही आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. अनेकदा टोकाचे वादही झाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला जिल्ह्यात उदयनराजेंविरोधात चेहरा न मिळाल्याने शशिकांत शिंदे यांनी हे शिवधनुष्य उचलत लोकसभेला उमेदवारी केली. या निवडणुकीत त्यांनी उदयनराजेंना कडवी टक्कर दिली. या निवडणुकीत कोरेगाव (Koregaon) मतदारसंघात सुमारे 7 मतांनी ते पिछाडीवर राहिले. तर महेश शिंदे यांनी तळागाळात केलेली विकासकामे, जनसंपर्क व कार्यकर्त्यांचे जाळे या जोरावर उदयनराजेंना आघाडी मिळवून दिली. आताच्या निवडणुकीतही महेश शिंदे विरूध्द शशिकांत शिंदे यांच्यातच लढत होणार आहे. यामध्ये शशिकांत शिंदे यांच्याकडून मतदारसंघात सुरू असलेल्या दडपशाही व हुकूमशाहीविरोधात भूमिका घेवून निवडणूक लढवली जाणार आहे. तर महेश शिंदे यांच्याकडून गावागावात केलेली विकासकामे व पाणी प्रश्नावर निवडणूक लढवली जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.