मनसेच्या वतीने प्रथमच माहीममधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thacheray) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मंगळवार, २३ ऑक्टोबर रात्री ही उमेदवारी जाहीर होताच काही तासांतच शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी यादी जाहीर झाली, त्यामध्ये माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशातच उद्धव ठाकरे माहीम मतदार संघात उमेदवार देणार नाही अशी चर्चा सुरु झाली, मात्र बुधवारी ही चर्चा फोल ठरली. कारण उबाठाने येथून महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
तिरंगी लढत होणार
त्यामुळे आता माहीम मतदार संघाची लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे. याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील तीन टर्म ते याठिकाणाहून आमदार म्हणून निवडून येत आहेत, त्यामुळे अमित ठाकरे (Amit Thacheray) यांच्यासाठी सरवणकर यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यातच माहीम मतदार संघ शिवसेनेचा गड आहे. त्यामुळे या ठिकाणाहून उबाठाचा आमदार उभा करणे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अनिवार्य ठरले असावे म्हणून उबाठाने या ठिकाणाहून महेश सावंत यांना उमेदवारी दिली.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून मनसेचे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे २०२४ मध्ये परतफेड म्हणून उद्धव ठाकरे माहीममध्ये मनसेच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी चर्चा सुरु होती. पण उबाठाने येथून महेश सावंत यांना उमेदवारी देऊन लढतीचे चित्र स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community