नवी मुंबईत उभे राहणार ‘महसूल भवन’

92

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी सर्वसुविधानियुक्त भव्य ‘महसूल भवन’ नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शुक्रवारी केली.

( हेही वाचा : नाशिक-सिन्नर महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू)

९ ते ११ डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदानात कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे कार्यकारी संचालक अनिल माथूर, बार्कचे मुख्य वास्तुविशारद नागराज, पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभाग गतीमान करताना आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे. महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात नवी मुंबईत घेण्यात येईल, असे विखे पाटील यांनी सांगितले. कोरोनाकाळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेसोबत काम करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

१ हजार ६०० अधिकारी सहभागी

विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी तीन दिवसीय स्पर्धेमध्ये कोकण विभागातून जवळपास १ हजार ६०० अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले असल्याचे सांगितले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात खेळ संस्कृती रुजावी यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ महसूलमंत्री विखे पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून, तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्यांना निरोगी खेळ खेळण्यासाठीची शपथ देण्यात आली.

कोकण विभागाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग अशा सात जिल्ह्याच्या क्रीडा पथकांनी यावेळी संचालन केले. या क्रीडा संचलनात पालघर जिल्ह्याला तृतीय, रायगड जिल्ह्याला द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.