राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. त्याच दरम्यान आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचे निकालही समोर येत आहेत. यामध्ये शिंदे गटासोबतच भाजपलाही यश मिळताना दिसत आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना चांगलाच धक्का दिला आहे.
रोहित पवारांना धक्का
विधान परिषद निवडणूक जिंकून आमदार झालेल्या भाजपच्या राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवले आहे. कर्जत तालुक्यातील कोरेगाव, बजरंगवाडी आणि कुळधरण या तिन्ही ग्रामपंचायतींवर राम शिंदे यांनी भाजपचा झेंडा फडकवला आहे. कोरेगाव येथील 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 आणि कुळधरण येथील 13 पैकी 7 जागांवर राम शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे गटाचे वर्चस्व
राज्यातील इतर ग्रामपंचायतींवर देखील शिंदे गटाच्या आमदारांनी आपले वर्चस्व राखले आहे. औरंगाबाद येथील अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील 3 पैकी 2 ग्रामपंचायतीत शिंदे गटाने विजय मिळवला आहे. नानेगाव आणि जंजाळ या ग्रामपंचायतीत शिंदे गटाला यश मिळाले आहे. तसेच साता-यात शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात तब्बल 22 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्तर तांबवे ग्रामपंचायत शिंदे गटाने जिंकली आहे. तसेच पैठणमध्येही शिंदे गट विजयी झाला आहे.
Join Our WhatsApp Community