ममता-आदित्य भेट, महाराष्ट्रातले उद्योग बंगालमध्ये घेऊन जाण्याचा कट!

66

महाराष्‍ट्र दौ-यावर असणा-या पश्‍चि‍म बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्‍यांची भेट घेणारे मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍यात झालेल्‍या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्‍ट्र शासनाने जाहीर करावी, हे एक कट कारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्ताधारी शिवसेना मदत करीत नाही ना?, असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

पश्‍चि‍म बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचे काल मुंबईत आगमन झाल्‍यानंतर महाराष्‍ट्राचे पर्यावरण आणि राजशिष्‍टाचार मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. राज्याच्या मुख्‍यमंत्र्यांच्‍यावतीने ही भेट आपण घेतल्‍याचे आदित्‍य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्‍यामुळे या भेटीबाबत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी काही गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले आशिष शेलार? 

आमदार आशिष शेलार म्‍हणाले की, ममता यांचे महाराष्‍ट्रात सरकारी पक्षांनी स्‍वागत केले, ते प्रथेप्रमाणे अपेक्षित आहे. पण त्‍यानंतर मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी घेतलेली भेट ही बैठक कशासाठी होती? महाराष्‍ट्रात कोणीही आले की, आमचा कौटुंबिक स्‍नेह असल्‍याचे सांगून या भेटी घेतल्‍या जातात. तुमचा कौटुंबिक स्‍नेह असेलही आम्‍हाला त्‍याबद्दल काय करायचे नाही, पण महाराष्‍ट्राचा त्‍यांच्‍याशी काय सबंध? बांगलादेशीयांना संरक्षण देणा-या ममता बॅनर्जी यांच्‍याशी कुठले आले कौटुंबिक संबंध?, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा २०२४मध्ये भाजपाला पर्याय देण्यावर शरद पवार-ममता बॅनर्जींमध्ये चर्चा)

अधिकृत माहिती जाहीर करा

ममता बॅनर्जी महाराष्‍ट्रातील उद्योगांना आपल्‍या राज्‍यात यायचे आमंत्रण देण्‍यासाठी आल्‍या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंदे असले पाहिजे, हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्‍या राज्‍यातील उद्योग तुम्‍ही घेऊन जा, असे महाराष्‍ट्रातील सत्ताधारी शिवसेना ममता बॅनर्जी यांना सांगते आहे का? हा प्रश्‍न आहे. महाराष्‍ट्रातील रोजगार, व्‍यवसाय, इंडस्‍ट्री येथून घेऊन जाण्‍यास सत्ताधारी शिवसेना ममता दिदींना मदत करते आहे का?, महाराष्‍ट्रात कॉंग्रेसला ना स्‍थान, ना इज्‍जत, ना किंमत, ना स्थिती त्‍यामुळे कॉंग्रेसला काय ते त्‍यांचे त्‍यांनी ठरवावे. महाराष्‍ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्‍ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?  तसेच, नुकतीच भिवंडीत बांग्‍लादेशींयावर कारवाई झाली, अशा कारवाया पुन्‍हा करू नका, म्‍हणून सत्ताधारी शिवसेनेने ममता दिदींना शब्‍द तर दिला नाही ना? पश्चिम बंगालमध्‍ये विरोधकांच्‍या ज्‍या हिंसा केल्‍या जात आहेत, त्‍याचे धडे तर गिरवले जात नाही ना?, असे प्रश्‍न उपस्थित करून आमदार आशिष शेलार यांनी या बैठकीची अधिकृत माहिती जाहीर करा, अशी मागणी केली आहे.

( हेही वाचा : सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बनली सावरकर विरोधी! चित्रा वाघ यांचे टीकास्त्र )

बंगाल आणि महाराष्‍ट्र अस्थिर करण्‍याचा प्रयत्‍न

सिध्‍दीविनायकाकडे कोणी कुणासाठी काय मागावे हा ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न आहे. पण केंद्रीय स्‍थरावर भाजपाच्‍या विरोधात संघर्ष करण्‍यासाठी ज्‍यांना यायचे आहे त्‍यांचे कंडू शमन होईलच. एकदा आपापसात नेतृत्‍व कोण करणार ते तर ठरवा, असा प्रतिसवालही शेलारांनी केला आहे. आम्‍हाला जय हिंदू राष्‍ट्र हे मान्‍य आहे, ते ममतादिदींना मान्‍य आहे का? ते मान्‍य नसेल तर ते शिवसेनेला मान्‍य आहे का? असे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्‍या ममता दिदींच्‍या ‘जय बांगला जय मराठा’ या घोषणेबाबत दिले आहे. हिंसेच्‍या घटनांनी पश्चिम बंगालमधील जनता त्रस्‍त आहे. आता हे दोघे मिळून बंगाल आणि महाराष्‍ट्र अस्थिर करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. असा आरोप करत, शेलार म्हणाले, तुमच्याकडे आलेल्‍या टाटांना तुम्‍ही अपमानित करून पाठवले. उद्योग जगतात ज्‍यांचे आदराने नाव घेतले जाते त्‍या मुंबईकर टाटांचा ज्‍यांनी अपमान केला त्‍यांच्यासमोर शिवसेना महाराष्‍ट्रात पायघड्या घालते? म्‍हणून या बैठकीमागे कटकारस्‍थान आहे, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमधून सर्व लांडग्‍याने वाघिणीने पळवून लावले, असे शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केले होते. त्‍यावर पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्रि‍पुरात जाऊन संजय राऊत यांनी प्रचार करावा, त्रि‍पुरातून तुमच्‍या वाघिणीचे मांजर करून जनतेने पळून का लावले?, असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.