शिवसेना बांधणीत पालकमंत्री दीपक केसरकर पडतात कमी: केसरकर यांच्यापेक्षा लोढा ठरतात सरस

163

राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांचे सूत जुळताना दिसत नाही. मुंबईतील उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांचा निधी मंजूर केला असला तरी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र शहर भागातील विकासकामांसाठी निधीच मंजूर केला नाही. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक हैराण झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकप्रकारे एका बाजूला उपनगरांचे पालकमंत्री लोढा हे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध करून देत असताना दुसरीकडे शहराचे पालकमंत्री केसरकर हे कोणतेच पाऊल उचलत नसल्याने शिवसेनेसह भाजपच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकासकामांना खिळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारने मुंबईच्या विकासकामांवर भर दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुशोभिकरणाच्या कामांसह मुंबईतील विविध नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून त्याद्वारे कामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्येक महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये जात विकासकामांचा आढावा घेत प्रत्येक प्रभागांमध्ये भाजप व शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे. त्यामध्ये विशेषत: म्हाडाच्या जुन्या शौचालयांची दुरुस्ती व पुनर्बांधणी याकरता २०० कोटी रुपयांची तरतूद करुन देण्यात आली आहे. हा निधी महापालिकेला देऊन त्यांच्या माध्यमातून ही कामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

परंतु उपनगराचे पालकमंत्री हे प्रत्येक विभाग कार्यालयांच्या हद्दीतील विकासकामांचा आढावा घेऊन हे विकास निधीची तरतूद केली असली तरी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून आजवर कोणत्याही विकासकामांचा आढावा घेण्यात आला नाही. तसेच शहरातील भाजप आणि शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पत्र देऊनही त्यांनी हा निधी मंजूर केला नाही. परिणामी शहरातील विकासकामे रखडली आहेत. याबाबत उपनगरातील विकासकामांसाठी जिल्हानियोजन समितीचा निधीउपलब्ध झाला तरी शहरातील विकासकामांसाठी या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही.

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदार संघाचे आमदार असून त्यांना मुंबईचे त्याप्रमाणे ज्ञान नाही. त्यामुळे शहराचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आले असले तरी प्रत्यक्षात मुंबईतील एकही आमदार मंत्री न बनवल्याने हे पालकमंत्री कोकणातील आमदार असलेल्या मंत्र्यांकडे सोपवावी लागली आहे. त्यामुळे केसरकर यांचे पालकमंत्री राहणे हे एकप्रकारे शिवसेनेकरता धोक्याची सूचना असून याकरता शिवसेनेला आता मुंबईतील कोणा आमदाराला मंत्री बनवून त्यांना शहराचे पालकमंत्री बनवावे लागणार आहे. माहिम दादरचे आमदार सदा सरवणकर यांचे नाव मंत्रीपदाच्या स्पर्धेत होते, परंतु त्यांचाही पत्ता कापण्याचा प्रयत्न होत असल्याने शिवसेनेला केसरकर यांच्याशिवाय पर्याय नसून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी केसरकर यांच्याकडून कोणताही प्रयत्न होत नसल्याने पक्षातील नेत्यांसह भाजपचे पदाधिकारीही नाराज असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार – सुधीर मुनगंटीवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.