कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी करण्यात आली यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे मनीष सिसोदियांची होळी तुरुंगातच जाणार आहे.
( हेही वाचा : आमच्याकडून देणगी घ्या आणि इस्लाम कबूल करा; मेरठमध्ये होळीला देणगी मागणाऱ्या हिंदूंना मुसलमानांनी छेडले)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणात २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवले होते. त्यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे. यापुढे त्यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयातही जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सोमवारी झालेल्या सुनावणीत सिसोदिया यांनी केलेल्या विनंतीनुसार न्यायालयीन कोठडीत औषधं, डायरी, पेन, चष्मा आणि भगवद्गीता ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. तुरुंग प्रशासनाला त्याबद्दल कळवण्यात आले आहे. तसेच आपल्याला विपश्यनेच्या कोठडीत ठेवण्यात यावे अशीही विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर तुरुंगांच्या नियमांनुसार विचार व्हावा, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community