गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसंख्या आणि विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असलेल्या गोव्यात यावेळी भाजपा आणि काँग्रेस, मगोप या पारंपरिक प्रमुख पक्षांसोबतच आप, तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात पक्षांतरेही सुरू असल्याचे वृत्त माध्यमातून समोर येत आहे. दरम्यान, गोव्यातील पणजी विधानसभा मतदार संघात भाजपने उत्पल पर्रीकर यांचा दावा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे त्यांची बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी झाल्याचं कळतंय. उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघासाठी हट्टाला पेटले असले तरी पक्षाने बाबूश मोंसेरात यांचे नाव निश्चित केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर भाजप सोडणार? अशी चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय.
(हेही वाचा –देशात कोरोना लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती; आतापर्यंत 157 कोटी नागरीकांनी घेतली लस)
पण उत्पल हे पणजीतून निवडणूक लढवणार?
यासंदर्भात आज दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून गोव्यातील उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे राज्यात पडसाद उमटले होते. फडणवीस यांच्या प्रतिक्रियेला उत्पल पर्रीकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. भाजपच्या यादीची वाट न पाहाता उत्पल पर्रीकर यांनी स्वतःचा प्रचार सुरु केला आहे. पणजीत घरोघरी जाऊन ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
काय म्हणाले होते फडणवीस
दरम्यान, राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपामधूनही आऊटगोईंग सुरू झालं असून, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हेही तिकीट न मिळाल्यास भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं होतं. यावेळी ते म्हणाले, मनोहर पर्रिकर यांनी गोव्यामध्ये भाजपाला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लामेंट्री बोर्ड आहे, ते त्यासंदर्भातील निर्णय घेईल.