मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) प्रामाणिक काम करत होता, त्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तोवर त्याचे समर्थन होते. मी स्वतः दोन वेळा त्याला भेटायला गेलो, मात्र त्याने सरकारने केलेले काम न स्वीकारता आमच्यावर टीका केली उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत वाईट टीका केली, माझीही काढली. एकेरी भाषा होऊ लागली, तेव्हा मग ही भाषा कार्यकर्त्याची नाही तर राजकीय भाषा आहे, हे समोर आले. जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. आम्ही जाती जातीमध्ये वाद निर्माण करणार नाही ओबीसी बांधवांनाही तुमच्या आरक्षणाला धक्का देणार नाही असे सांगितले आणि त्याप्रमाणे मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले.
जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) रात्री अपरात्री कोण भेटते हे लपत नाही. दगडे कुणी जमवले, कुणी दगडे मारले, हे सगळे समोर आले आहे. आमदाराचे कुटुंब घरात असताना त्याचे घर जाळले, एसटी जाळल्या,हे कधीच क्षम्य नाही. कायद्याच्या चौकटीत बसणारे सगळे आम्ही केले आहे. उपमुख्यमंत्र्यांना बोलायचे, पण मुख्यमंत्र्यांना बोलायचे नाही, याप्रकारचे आमच्या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचे कारस्थान उघड झाले आहे. आम्ही कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात केली आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे, कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या करणे योग्य नाही. कायद्याचे उल्लंघन कुणाला करता येणार नाही. अमुक एक बंद करा, हे गाव बंद करा, हे जाळून टाका, असे कधी झाले नव्हते. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आज पंतप्रधान मोदी यांचे नाव जगभर घेतले जाते. त्यांच्याबद्दल चुकीचे उद्गार काढणे शोभत नाही, एखाद्या मर्यादेपर्यंत स्वीकार करता येईल. पण जेव्हा त्यांची भाषा कायद्याच्या विरोधात होऊ लागली, तेव्हा मग यामागे राजकीय वास दिसला. कुणा आमदाराची गाडी अडवून जाळली तर चालणार नाही. नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवले, नवनीत राणाला जेलमध्ये ठेवले, आम्ही मात्र सूडबुद्धीने वागत नाही. या सगळ्या आंदोलनाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, तेव्हा कुणावर सूडबुद्धीने कारवाई करणार नाही. कुणीही व्यक्ती खालच्या पातळीवर बोलत असेल, खोटेनाटे बोलत असेल तर कधीही सहन केले जाणार नाही. सरकार म्हणून एकत्र बसून यावर निर्णय घेतला आहे. १० टक्के आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला, त्यानंतर हे आरक्षण टिकणार नाही असे म्हणू लागले, का टिकणार नाही यांची कारणे मात्र देत नव्हते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community