मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आहे. त्यानंतर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी महिन्याभराचा दिलेला कालावधी संपला असून आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली वाढल्याचं दिसत असून मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करून मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोनवरच जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना स्पष्ट शब्दांत सुनावत त्यांचं ऐकण्यास नकार दिला. (Maratha Reservation)
गिरीश महाजन यांनी फोनवर मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्य सरकारची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी उलट गिरीश महाजनांनाच महिन्याभरात आरक्षणाचा निर्णय घेणार होता, त्यासाठीच वेळ दिला होता, त्याचं काय झालं? असा जाब विचारत उपोषण न करण्याचा त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.
(हेही वाचा : Nilesh Rane : निलेश राणे राजकारणात पुन्हा सक्रिय, २४ तासात असे काय घडले ?)
आंदोलकांवरचे गुन्हे मागे नाही घेतले तर तुम्ही आरक्षण काय देता
आरक्षण कायमस्वरूपी व्हायचं असेल तर थोडा वेळ आणखी कळ सोसावी लागेल. पण सगळेच त्यावर अभ्यास करत असून ही सगळी प्रक्रिया अंतिम पायरीवर पोहोचली आहे. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका. आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे, पण ते वरवरचं द्यायचं नाही”, असं गिरीश महाजन फोनवर जरांगे पाटील यांना म्हणाले.दरम्यान, गिरीश महाजनांच्या भूमिकेवर मनोज जरांगेंनी त्यांनाच प्रतिप्रश्न केला. “साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. आम्हाला जर आदर नसता, तर तुम्ही १५ दिवस मागितले असताना आम्ही ३० दिवस दिले असते का? त्यावरही आणखी १० दिवस वाढवून दिले आम्ही. आता आमचं काय चुकलं सांगा”, असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.आमच्या लेकरांचं आयुष्य धोक्यात आलंय. आरक्षण वरवरचं द्यायचं नाहीये् हेच तुम्ही तेव्हाही म्हणत होता. त्यासाठीच एक महिन्याचा वेळ दिला होता. पण आता ४१वा दिवस आहे. अजून काम चालू म्हणत असाल तर ते काम असं १२ वर्षं चालूच राहील मग जाऊ द्या तिकडं”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजनांना सुनावलं. दरम्यान, यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेण्यासंदर्भातही मुद्दा उपस्थित केला. “आंतरवलीसह महाराष्ट्रातल्या आंदोलकांवरचे गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो असं म्हणाले होते . एकही गुन्हा मागे घेतला नाही. तुम्हाला तेही जमलं नाही तर आरक्षण कसलं देताय तुम्ही आम्हाला? आंदोलन चालू आहे तोपर्यंत गुन्हे मागे घ्यायचे नाहीत अशी तुमची भूमिका दिसतेय”, असंही जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना सांगितलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community