मुंबईत मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव झाला, यातील अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने आले आणि त्यामुळे मंत्रालयाच्या खिडक्या आणि मंत्रालय परिसरात पार्क करण्यात आलेल्या गाड्यांच्याही काचा फुटल्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंत्रालयाच्या जवळील परिसरात मेट्रोच्या सब वेचे काम सुरू आहे. या सब वेच्या कामासाठी लहान सुरुंग लावून स्फोट घडवण्यात येत आहे. या सुरुंगामुळे दगड उडाले आणि ते थेट मंत्रालयाच्या परिसरात पडले. या दगडांमुळे मंत्रालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. इतकेच नाही तर मंत्रालयाच्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मरीन लाईन पोलीस ठाण्यात मेट्रोचे काम करणा-या एल अॅण्ड टी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. मंत्रालयाच्या परिसरात सुरू असलेल्या या कामाच्यावेळी सुरुंग लावण्यात येत असल्याने सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली होती ही नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेत मंत्रालयाच्या काचा फुटल्या आहेत आणि गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. पण सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पण योग्य ती काळजी घेऊन काम सुरू नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. कारण अशा प्रकारच्या या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.
Join Our WhatsApp Community