शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपले अश्रू आवरता आले नाही. राऊत जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची जागा सुषमा अंधारे यांनी घेतलेली असून त्या जागेचे वारसदार परत आल्याने सुषमा अंधारेंचे पक्षातील वजन कमी होणार आहे. त्यामुळे अंधारेंचे हे आनंदाश्रु होते की दु:खाश्रु होते असा प्रश्न खासगीत चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे राऊत पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते, परंतु ते जेल मध्ये गेल्यानंतर हे पद खासदार अरविंद सावंत यांना हे पद दिले गेले. पण आता राऊत परत आल्याने सावंत यांच्याकडून हे मुख्य प्रवक्ते पद काढले जाणार आहे. त्यामुळे राऊतांचे परतणे हे एकप्रकारे अंधारेंसह अरविंद सावंत आणि इतरांच्याही जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.
( हेही वाचा : उंदीर मामांनी पळवून लावलेल्या अधिकाऱ्यांना अखेर वनाधिकाऱ्यांनी दिला बंगला)
पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर १०३ दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेची ही तोफ थंडावल्याने त्यांची जागेवर सुषमा अंधारे यांची तोफ शिवसेनेने निर्माण केली. त्यामुळे अंधारे या संजय राऊत यांचा पर्याय म्हणून वावरत आहेत. परंतु जामिनावर सुटका झाल्यानंतर ही जागा घेण्यास संजय राऊत सज्ज झाले. त्यामुळे अंधारे यांची पक्षातील महत्व आणि वजन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत यांच्या अनुपस्थितीतील ४० आमदारांचा समाचार घेण्यासाठी अंधारेंच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंधारे या पक्षातील मोठ्या नेत्या असल्यासारख्या वावरत असल्या तरी राऊत यांच्या परत येण्याने त्यांच्या मनात एकप्रकारे भीतीचे वातावरण तयार झाले.
राऊत यांना जामिन मंजूर झाल्यानंतर अंधारेंना अश्रु आवरता आले नाही. परंतु हे अश्रु आनंदाचे होते की भविष्यात आपल्या जागेला धोका निर्माण झाल्याने दु:खाश्रु होते असा प्रश्न खासगीत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अंधारे यांना आता पक्षातील कार्यक्रमांमध्ये जास्त मान मिळणार नाही. राऊतांची उणीव आपणच भरु काढत असल्याचे चित्र अंधारे निर्माण करत असल्या तरी आता मात्र शिवसैनिक अंधारे यांना स्वीकारणार नसल्याचेही बोलले जात आहे. राऊतांच्या अनुपस्थितीत अंधारेंना केवळ मजबुरी म्हणून स्वीकारले असल्याच्याही प्रतिक्रिया खासगीत शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहे. परंतु बाळासाहेबांसह आदित्य ठाकरेंवर केलेल्या टिकेमुळे अंधारे यांना आपल्या ह्दयात केव्हाच स्थान मिळू शकत नाही असेही कट्टर शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
अंधारे यांच्याप्रमाणेच आता खासदार अरविंद सावंत यांना राऊतांचे परतणे रुचलेले नसल्याचे बोलले जात आहे. राऊतांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्य प्रवक्ते पद सावंत यांना देण्यात आले असले तरी आता या पदाचे मानकरी आल्याने राऊत यांच्याकडे हे पद जाणार आहे. त्यामुळे सावंत काहींसे नाराज असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे राऊतांच्या अनुपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषद आणि बैठकांमध्ये काही नेत्यांना अत्यंत जवळची आसने मिळाली होती. परंतु राऊत असताना ही जवळची स्थाने मिळत नव्हती. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये उध्दव ठाकरेंच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळाली असली तरी भविष्यात राऊतांचा हस्तक्षेप वाढल्यास उध्दव ठाकरे यांच्या आसपासही फिरकता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे काही नेतेही काही प्रमाणात नाराज असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community