शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार: प्रवेशाचा ठरणार मेळावा?

96

दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क कुणाला मिळेल याबाबत अद्यापही कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. परंपरागत दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेने आधीच परवानगीसाठी अर्ज केला आहे, त्यानंतर बाळासाहेब शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी अर्ज केल्याने नक्की कुणाला ही परवानगी मिळेल आणि कोण मैदान मारुन नेईल याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे गटासाठी हा मेळावा अस्तित्वाचा ठरणार आहे. मात्र, कुणाचा मेळावा कुठे होईल हे आज जरी निश्चित झाले नसले तरी बाळासाहेब शिवसेना गटाचा मेळावा होणार असून हा मेळावा म्हणजे शक्ती प्रदर्शनासह शिवसैनिकांच्या प्रवेशाचा मेळावा ठरणार आहे. या मेळाव्यात शिंदे गटांमध्ये शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबईत आणखी २४ बायोटॉयलेटची उभारणी)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांसह इतर माजी नगरसेवक व पदाधिकारी यांना बाजुला करत बाळासाहेब शिवसेना गटाची स्थापना केली. त्यामुळे आपला शिवसेना पक्ष खरा असल्याचा दावा शिंदे गटाने करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने फुटून गेलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत त्याजागी शिवसेना नेते, उपनेते आणि सचिव पदासह विभागप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु आजही शिवसेनेतील अनेक पदाधिकारी हे शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचा एकेकांचा प्रवेश करून घेण्याऐवजी दसऱ्याला मेळावा आयोजित करून त्यामध्ये मुंबईसह इतर भागांमधील बड्या नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी शिंदे गटांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

यामध्ये मुंबईतील शिवसेनेच्या काही लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी शिंदे गटांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेने पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली आहे. युवासेनेचे कोषाध्यक्ष असलेल्या आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या घरी गणपती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यामुळे घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अनेक पदाधिकारीही शिंदे गटात जाण्यासाठी आतूर असून यासर्वाना वेट अँड वॉचचा संदेश दिला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवाजीपार्कमध्ये हा दसरा मेळाव्याला परवानगी न मिळाल्यास बीकेसी किंवा अन्य ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करून त्यामध्ये इच्छुकांना पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिंदे गटाकडून मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.