मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत सर्वप्रकारची शासकीय नोकर भरती थांबवावी, अशी मागणी कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही न झाल्यास १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
(हेही वाचा – साता-यातील शिवसेनेचा युवा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील)
दरम्यान, यासंदर्भातील निवेदन तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले असून ओबीसी राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत राज्यातील सर्वप्रकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत. ओबीसी बांधवांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये या काळजीपोटी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ ला मंत्रालयावर पहिला मोर्चा काढला होता. त्यावेळापासून आतापर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे ५० टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गातून संविधानिक आरक्षण मिळू शकलेले नाही. त्यामुळे मराठा समाजातील अनेकांना शैक्षणिक व नोकरीमधील संधीपासून वंचित रहावे लागले आहे. हा खूप मोठा अन्याय मराठा समाजावर होत असल्याचे म्हटले जात आहे. मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत सर्वप्रकारच्या शासकीय नोकरीभरती पुढे ढकलण्यात यावी. महिन्याभरात गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला ५० टक्के मर्यादेत व ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण लागू करावे, अन्यथा १० ऑक्टोबरपासून कऱ्हाडला बेमुदत साखळी उपोषण केले जाईल.
Join Our WhatsApp Community