छत्रपती संभाजी हे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 7 मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. छत्रपती संभाजींच्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. या तिस-या दिवशी संभाजीराजेंची तब्बेत बिघडल्याने, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. या मराठा मोर्चाने संध्याकाळपर्यंत जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यात घुसू, असं म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारला इशारा दिला आहे.
सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश खैरे-पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडली आहे. संभाजी राजे यांनी मांडलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या पाहिजेत. या मागण्यांबाबत त्यांची आधीच सरकारसोबत चर्चा झाली आहे. सरकारने तेव्हा सकारात्मक भूमिकाही घेतली होती. फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे, सरकारने त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा. आता चर्चेचा प्रश्नच येत नाही, असंही क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
( हेही वाचा: तासाभरासाठी अंधारात गेलेल्या मुंबईत आता कायमचा होणार काळोख? )
तीनचाकी सरकारचा निषेध
छगन भुजबळ यांच्या दबावाखाली सरकार काम करत आहे का? विजय वडेट्टीवार यांच्या दबावाखाली काम करत आहे का? ओबीसी राजकारणाला आमचा विरोध नाही. परंतु इम्पेरिकल डाटा जमा करूनच आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे, असं समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितलं. संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्याची किंवा सरकारसोबत बैठक करण्याची गरज नाही. सरकारने थेट पत्र घेऊनच आझाद मैदानात यावे, असं सांगतानाच आता आमचा संयम संपला आहे. आम्ही शांत बसणार नाही. या तीनचाकी सरकारचा आम्ही निषेध करतो.
राज्यपालांचं वय वाढलंय
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांचे वय वाढलेले आहे. महाराष्ट्र आणि देशाबाहेरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु फक्त जिजाऊ होत्या. त्यामुळे राज्यपालांनी सर्व शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे, नाही तर राज्यपालांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश खैरे-पाटील यांनी दिला.
Join Our WhatsApp Community