मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनापाठोपाठ राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सह्याद्री शासकीय अतिथीगृहात संध्याकाळी ही बैठक होईल.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांसोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, मनसेसह ठाकरे गटाचाही समावेश आहे. मात्र, आपल्याला या बैठकीचे अद्याप निमंत्रण मिळाले नाही, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर निमंत्रण मिळाले असले तरी ठाकरे गट बैठकीला उपस्थित राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचा तिढा सोडवायचा कसा यासाठी राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोंडी फुटणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सर्व प्रमुख पक्षांमध्ये मराठा आणि ओबीसी असे दोन गट असल्याने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याने सरकारची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली आहे.त्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असोत किंवा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार असोत दोघेही ओबीसी समाजातून येतात.त्यामुळे स्वतःच्या समाजाचा विरोध ते पतकरतील का ? आणि मराठा समाजाच्या बाजूने उभे राहतील का ? हा देखील मोठा प्रश्न आहे.
(हेही वाचा-Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचच यूएस ओपनचा बादशाह; चौथ्यांदा कोरलं अमेरिकन ओपनवर आपलं नाव)
आंदोलनाची व्याप्ती वाढल्याने सरकारची आणखी कोंडी झाली आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सध्या मुख्यमंत्री शिंदे हेच प्रयत्नशील आहेत. लाठीमाराच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्हणावा तेवढा पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा तिढा नक्की आजच्या बैठकीतून सुटेल का ? की हा तिढा वाढतच जाऊन आरक्षणाच घोंगड भिजतच पडेल हे येणारा काळच ठवेल.