मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्र सरकारने यात घाई करून काहीच उपयोग नाही. गेल्या दोन आठवड्यांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणते काम केले, याचा अहवाल त्यांनी आधी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला सादर करावा. त्यानंतरच पुढे जावे, असा सल्ला प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिला. अमरावती येथे या विषयावर आमदार कडू यांनी रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट केली.
सरकारने घाई केल्यापेक्षा आधी १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. आताच सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तारीख वाढवून मागण्यासाठी जात आहे. अशी घाई केल्याने काही फरक पडणार नाही, असे आमदार कडू यांनी सरकारला सुनावले. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचे शिष्टमंडळ सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी भेटणार आहे. सरकारकडून मराठा आरक्षणा (Maratha Reservation) साठी जरांगे यांनी दिलेली वेळमर्यादा वाढवून मिळावी, अशी अपेक्षा हे शिष्टमंडळ व्यक्त करणार आहे. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले. ते म्हणाले की १५ दिवसांचा प्रगती अहवाल पाहिल्यानंतर तर खरच जरांगे यांना पटले की सरकार काहीतरी करतेय तर तेच मुदत वाढवून देतील. उद्या सरकारी शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट होणारच आहे. त्यामुळे सरकारने आताच घाई करू नये, असा सल्लाही आमदार कडू यांनी दिला.
(हेही वाचा : ICC Cricket World Cup IND vs SA : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान)
Join Our WhatsApp Community