सर्व बोली भाषांना जोडणारी भाषा मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही सर्वसंपन्न भाषा आहे. या मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. पुणे, सांगली, सातारा, मुंबई व विदर्भात मराठी वेगळी बोलली जाते. त्यामुळे मराठी भाषा ही शहरांप्रमाणे बदलत जाते. संत ज्ञानेश्वर यांच्या काळापासून ते कवी मर्ढेकर यांच्या कवितांपर्यंत मराठी भाषेत बदल जाणवतात, असे प्रतिपादन करत सुप्रसिद्ध सिने व नाट्य दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी आजच्या तरुणांनी मराठी भाषा समजून घेण्यासाठी अधिकाधिक साहित्य वाचावे. त्यामुळे बोली भाषा, शब्द सामर्थ्य यांचे ज्ञान मिळेल, असे आवाहन त्यांनी यावेळी तरुणांना केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस ‘ मराठी भाषा दिन ‘म्हणून मुंबईसह राज्यभरात साजरा करण्यात येतो. मुंबई महापालिकेतर्फे यानिमित्ताने पालिका स्तरावर ‘ मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. सोमवारी पालिका सभागृहात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली व उप महापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा
याप्रसंगी, प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध सिने व नाट्य दिग्दर्शक जब्बार पटेल होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी, जब्बार पटेल यांनी, कविवर्य कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, आचार्य अत्रे, ग. दि. मांडगूळकर, अभिनेते श्रीराम लागू, चंद्रकांत, सूर्यकांत, भालजी पेंढारकर, नामदेव ढसाळ, एस.एम. जोशी व अन्य कवी, साहित्यिक, लेखक, अभिनेते आदींच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी भाषेची जडणघडन, भाषेतील गोडवा, प्रसिद्ध कवींच्या कवितेतून, लेखकांच्या साहित्यातून वापरण्यात आलेली मराठी भाषा यांचा दाखला देत त्यांनी मराठी भाषेची महती व्यक्त केली.
तात्या (कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर) म्हणत की, आपले घर म्हणजे मराठी भाषा तर घराची खिडकी म्हणजे इंग्रजी भाषा, त्या खिडकीतून जग बघा, खिडकी बंद करू नका, कारण तुम्हाला त्यातून विज्ञान कळेल, असे किस्से सांगता कवी शिरवाडकर यांच्या आठवणी जाग्या केल्या. जर्मनीतील एका कॉन्फरन्सला दलित पँथर, दलित साहित्यिक नामदेव ढसाळ हे गेले होते. त्यांच्या कविता अफाट गाजल्या. त्यांची भाषा या महाराष्टाच्या मातीतून घडलेली व त्यात रागही होता, अशी आठवण त्यांनी यावेळी जागवली.
या कार्यक्रमाला, शिवसेना आमदार सुनील शिंदे, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, नगरसेवक रमाकांत रहाटे, सुजाता सानप, राज राजेश्वरी रेडकर, स्वप्नील टेम्बवलकर, अभिजित सामंत, समृद्धी काते, भालचंद्र शिरसाट, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी पाट्यांची कारवाई सकारात्मक करावी – महापौर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा आत्मविश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त करत मुंबईत दुकानांवरील पाट्या या मराठी भाषेतून असाव्यात यासाठी पालिका प्रशासन सकारत्मक कार्यवाही करेल, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला
Join Our WhatsApp Community