Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: नव्या शैक्षणिक धोरणात मराठी ज्ञान व्यवहाराची भाषा होणार; फडणवीसांचं प्रतिपादन

120

मराठी ही ज्ञान भाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबतची चिंता दूर होईल, असा आशावाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालय परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी शुभारंभाच्या सत्रात फडणवीस बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार समीर मेघे, माजी आमदार सागर मेघे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्वला मेहेंदळे, विलास मानेकर, गजानन नारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठीत साहित्य संमेलनाची उज्ज्वल अशी परंपरा आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, विविध विचारांचे साहित्य संमेलने उत्साहात पार पडतात. साहित्य संमेलने हे उणीवांवर बोट ठेवण्यासाठी नव्हे तर जाणीवा समृद्ध करणारे असते. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला असा आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, सकाळी टीव्ही लावल्यावर जे साहित्य राजकारण्यांच्या तोंडून ओसंडून वाहताना दिसते, त्यावरून आम्ही साहित्यिक नाही असे कुणी म्हणू शकत नाहीत. आमच्यातही बरेच साहित्यिक आहेत. आम्हीच साहित्यिकांची प्रेरणा आहोत आणि म्हणून व्यासपीठावर मिळणारी लहानशी जागा सुद्धा आम्ही व्यापून घेतो, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचा – साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल, पण सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये; नरेंद्र चपळगावकरांचे रोखठोक मत)

वर्तमानात नवनिर्मित साहित्याला उंची आणि खोली नाही. मात्र भविष्यात ती मिळेल असा आशावादही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ९६व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका ‘वरदा’चे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रस्ताविक प्रदीप दाते यांनी केले तर संचालन रेणुका देशकर यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाला १० कोटी

विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले आहे. संघाच्या शताब्दीं वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.