देशातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुका या सोमवार 18 जुलै रोजी होणार असतानाच आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजपाकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात आता विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी
सध्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार असल्याने 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. शनिवारी भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना देण्यात आली. त्यानंतर विरोधकांकडूनही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या. रविवारी तब्बल 17 विरोधी पक्षांच्या प्रमुखांची शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट झाली. त्यावेळी एकमताने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. याआधी अल्वा यांनी गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंड अशा चार राज्यांमध्ये राज्यपाल पद भूषविले आहे. तसेच त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रीपदांचा देखील कार्यभार सांभाळला आहे.
Join Our WhatsApp Community