मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कोविड परिस्थितीबाबत विधान भवन, नागपूर येथे बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, गिरीश महाजन, संजय राठोड, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यात तुर्तास तरी मास्कची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीएफ-७ हा व्हेरिएंट आपल्याकडे आधीही येऊन गेलेला आहे. त्याचा संसर्ग वेग १० पटीने आहे. पण, तो फारसा धोकादायक नाही. त्यामुळे भीती नको, काळजी घ्या. ६० वर्षांवरील व्यक्ती. व्याधीग्रस्तांनी काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात मास्कची सक्ती नाही. लसीकरण, चाचण्यांवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. जनुकीय चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढलेली आहे, असे आरोग्यमंत्री सावंत म्हणाले.
(हेही वाचा तेलंगणाच्या आरोग्य संचालकांनी तोडले अकलेचे तारे; भारतात कोरोना येशूमुळे नियंत्रणात)
जुनी टास्क फोर्स कायम
ज्यांनी तिसरा डोस अद्याप घेतलेला नाही, त्यांनी तो तात्काळ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात एकूण 132 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 रूग्णालयात दाखल आहेत. राज्यातील कोरोना केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. जागतिक परिस्थिती, संभाव्य वाढीच्या बाबतीत राज्याची तयारी, लसीकरण, इत्यादी विषयांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. चीन, जर्मनी, डेन्मार्क आणि ब्राझीलमधील प्रवाशांचे २ टक्के याप्रमाणे रँडम चेकिंग करण्यात यावी, राज्य टास्क फोर्स स्थापन करून तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. डॉ. ओक यांच्या अध्यक्षतेखालील जुनी टास्क फोर्स कायम करण्यात आली आहे, त्यात आणखी दोन-तीन नावे वाढतील, असेही आरोग्यमंत्री सावंत म्हणाले.
Join Our WhatsApp Community