मागील वर्षभरापासून रुग्णालयांना आगी लागणे, ऑक्सिजन लीक होऊन रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रकार वाढत चाललेले होते. मागील २-३ महिन्यांपासून अशा घटना घडल्या नाही, त्यामुळे राज्यातील रुग्णालये आता आगीपासून सुरक्षित झाली आहेत, असे वाटत असतानाच नगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामध्ये १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.
संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यही मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी अहमदनगर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम देखील दाखल झाली आहे.
(हेही वाचा : ललित हॉटेलमधील शराब, शबाब, कबाबच्या पार्ट्यांशी राष्ट्रवादीचा काय संबंध?)
मागील वर्षभरात रुग्णालयांमधील मृत्यूचे तांडव
- नाशिक येथील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ जण दगावले होते.
- पालघर जिल्ह्यातील विरार येथे विजय वल्लभ रुग्णालया भीषण आग लागली होती. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
- नागपूर-अमरावती मार्गावरील वेल ट्रीट रुग्णालयाला आग लागली. ज्यामध्ये ४ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता.
- भांडुप येथील ड्रीम्स मॉलला आग लागली. त्यानंतर तेथील धुराचे लोट तिसऱ्या मजल्यावरील सनराईज कोविड रुग्णालयात पसरले. ज्यामध्ये १० रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
- भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागालाच आग लागली होती. ज्यामध्ये १९ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता.