दक्षिण-मध्य मुंबई शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर या लोकसभा मतदार संघातील शीव, अणुशक्ती नगर आणि चेंबूर या तीन विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलावण्यात मातोश्रीवर आली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना तातडीने मंगळवारी मातोश्रीवर नेत उध्दव ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठिशी हे सर्व पदाधिकारी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. परंतु चेंबूर आणि अणुशक्ती नगरमध्ये शेवाळे यांचे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने असल्याने, तेही फुटून जाण्याच्या भीतीने ही बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आल्याचे बोलले जात असून, या माध्यमातून का होईन पदाधिकाऱ्यांना मातोश्रीचे दर्शन घडले. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी हे शेवाळे फुटून गेले, त्यामुळे काही होईना आम्हाला मातोश्री आणि उध्दव ठाकरेंची भेट झाली असे, मनोमनी भावना व्यक्त करताना दिसत होते..
… म्हणून बोलावले मातोश्रीवर
दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला असून शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उध्दव ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्याच युतीला आम्ही पाठिंबा दिल्याचे सांगितले. मुंबईतील शिवसेनेवर ठाकरे घराण्याचा अधिकार असून शेवाळे हे मुंबईतील खासदार असल्याने त्यांच्यासोबत अन्य पदाधिकारी जाण्याची भीती असल्याने मातोश्रीने तातडीने सर्व पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर निमंत्रित केले. विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी विभाग समन्वयक,उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक, उपशाखाप्रमुख, महिला संघटक, महिला शाखा संघटक आदींनी मातोश्रीवर नेत एकही पदाधिकारी शेवाळे यांच्यासोबत नसल्याची खात्री पटवून दिली.
राहुल शेवाळे यांच्या गटात निमेश भोसले, शेखर चव्हाण तसेच इतर माजी नगरसेवक आणि पदाधिकारी असून, या सर्वांवर शिवसेनेची बारीक नजर आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी मातोश्रीवर येत उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरेंसोबत सेल्फी काढत यासर्वांनी आम्ही आपल्याला आणि शिवसेनेला सोडून जाणार नाही याची ग्वाही दिली. यापूर्वी चेंबूरमध्ये प्रस्थ असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेना सोडून गेल्यानंतर, शिवसेनेने पुन्हा राहुल शेवाळे, तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, शेखर चव्हाण आदींच्या मदतीने चेंबूर आणि आसपासचा परिसर बांधून पुन्हा एकदा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले होते. परंतु पुन्हा एकदा शेवाळेंच्या रुपाने या भागातील शिवसैनिकांसमोर आव्हान उभे झाले आहे. राणे हे काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. परंतु शेवाळे शिवसेनेतच असून दुसऱ्या गटात सामील झाल्याने शिवसेनेसमोरील आव्हान अधिकच जटील बनले आहे. त्यामुळे भविष्यात शेवाळेंच्या विरोधात लढायचे कसे असा प्रश्न या भागातील पदाधिकाऱ्यांना पडायला लागला आहे. दरम्यान, आजवर मातोश्रीवर प्रवेश न मिळणाऱ्या या सर्व पदाधिकाऱ्यांचे आदरातिथ्य झाल्याने सर्व शिवसैनिक भारावून गेले. काहींनी तर मनोमनी शेवाळेंना धन्यवाद देत, ‘आपण गेलात म्हणून तरी मातोश्रीचे दर्शन लाभल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. तर काहींची संशयी नजर, नक्की यातील कोण पक्षात राहणार आणि कोण शेवाळेंसोबत जाणार याचा शोध घेत होती.
Join Our WhatsApp Community