‘दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘आपण वर्षभर ज्या सणाची वाट पाहतो. तो सण म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी. दिवाळीचा हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी भरभराट घेऊन येवो, ही सदीच्छा. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीपोत्सवाचं हे तेज, चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो अशी मनोकामना करतो. दीपोत्सवाच्या या मंगल पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग,आरोग्य, कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ऊर्मी देतो.
या निमित्तानं परस्परांविषयीचा आदर वृद्धींगत होतो. नात्यांमधील विश्वास, गोडवा वाढत जातो. आपले सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात. अशी समृद्ध संस्कृती आपल्याला लाभली आहे. ती आणखी समृद्ध करण्याची, तिचा गौरव वाढविण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी एक जबाबदारी म्हणून आपण सर्व सण पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साजरे करण्याचा संकल्प करूया. सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षितता यांचे भान बाळगून दिवाळीचा आनंद लुटूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
Join Our WhatsApp Community